६ जून २०१५ - महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला लेख
अभिजात नाट्याचा चिरेबंद प्रयोग -
मराठी नाटकांनी बहुतकरून वास्तववाद वापरला, पण नाट्यमाध्यमाची ताकद अचूक हेरून वास्तववाद कसा वापरायचा याचा धडा घालून दिला एलकुंचवारांच्या 'वाडा चिरेबंदी'ने. आणि नाटकातून वास्तववाद हद्दपार करायला हवा, अशी भूमिका घेऊन नाटक रचणाऱ्यांनाही उत्तर दिलं 'वाडा चिरेबंदीने'च. वास्तववादापेक्षाही निसर्गवादाच्या अंगाने जाणारी चिरेबंद रचना करत नाटककार महेश एलकुंचवार यांनी ढासळत जाणाऱ्या एकत्र कुटुंबव्यवस्थेचा काळाच्या विशिष्ट तुकड्यावर आडवा छेद घेत मानवी नातेसंबंधांचं कवितेच्या पातळीवर जाणारं एक शोकात्म भान या नाटकातून दिलं आहे. असं भान देणाऱ्या मोजक्याच कलाकृती रंगभूमीच्या पेटाऱ्यात आहेत. त्या जुन्या मख्मली वस्त्राप्रमाणे अधून मधून काढून पाहाव्यात, आणि त्यांची इभ्रत ठेवून ल्याव्यात. यात रंगभूमीची शान आहे, रंगकर्मींचा कस आहे आणि प्रेक्षकांना माध्यमाच्या श्रीमंतीचं भान देणं आहे. या तिन्ही गोष्टींची प्रचीती चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'वाडा चिरेबंदी'च्या नव्या प्रयोगाद्वारे देण्याची स्तुत्य गोष्ट जीगिषा आणि अष्टविनायक या नाट्यसंस्थांनी केली आहे. अर्थातच या प्रयोगाने एलकुंचवारांच्या संहितेची इभ्रत राखली आहे.विदर्भातल्या एका खेड्यातल्या कधीकाळी चिरेबंदी असलेल्या वाड्याच्या आसऱ्याने राहणाऱ्या धरणगावकर देशपांडेंच्या कुटुंबातल्या माणसांची नाती वाड्याच्या भिंतींप्रमाणे ढासळत चालली आहेत, विसविशीत होत चालली आहेत, फाटत चालली आहेत. त्याचा सल त्या माणसांना आहे, म्हणून त्यांच्या जीवाची तगमग होते, पण स्वार्थही तितकाच मोठा आहे. त्यामुळे माणसं जवळ येतातसं वाटतं तोच परस्परांपासून दूरही जातात. एखाद्या अर्धवट शीर तुटलेल्या जनावरासारखी तडफड आपण अनुभवतो. ही गोष्ट कंगालीतही घराण्याचा मोठेपणा जपून ठेवणाऱ्या थोरल्या भास्करची आहे, मुंबईत राहून काटकसरीत संसार करणाऱ्या आणि गावच्या इस्टेटीतल्या वाट्याकडे डोळे लावून असणाऱ्या मधल्या सुधीरची आहे, त्यांच्या बायकांची आहे, मुलांची आहे, कुठल्याही उद्देशाविना ढोरासारखं राबत राहणाऱ्या धाकट्या चंदूची, रूढीपरंपरांच्या खाईत मातेरं झालेल्या पण त्याही स्थितीत शिकून घराबाहेर पडण्याची आस बाळगणाऱ्या प्रभाची आहे, मरण पावलेल्या नवऱ्याचे दिवसकार्य नीट पार पडावेत एवढीच इच्छा आता उरलेल्या आईची आणि कान-डोळे गेलेल्या, संवेदना बधीर होऊन मरणाची वाट पाहात पडून राहिलेल्या दादीचीही आहे. नाटकात घटना फारशा नाहीतच. वाड्यासमोरच्या जुनाट ट्रॅक्टरचा पत्रा चंदूच्या पायाला लागतो आणि रंजू गावातल्या मास्तरबरोबर पळून जाते- जाताना सोन्याचा डबा नेते, याच प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टी. नाटकाच्या सुरुवातीला सुधीर आणि अंजली बाप्पाजींच्या दिवसकार्यासाठी मुंबईहून गावी येतात आणि शेवटी प्रस्थान ठेवतात. या दोन टोकांत नाटक घडतं. मुख्यतः माणसांच्या मनात घडतं, संवादांतून बाहेर येतं आणि बिनसंवादांतून व्यक्त होत राहातं.
एकविसाव्या शतकाचा वेग 'वाडा'तल्या घटना-प्रसंगांना नाही. किंबहुना या वेगाची सवय झालेल्या आजच्या माणसांना नाटकाची इतकी संथ गती पाहण्याची सवय नाही. चंद्रकांत कुलकर्णींनी आजच्या गतीला शरण न जाता नाटकाची ठाय लय सोडलेली नाही, उलट वाड्यातल्या माणसांचा इथून तिथे जातानाचा लांबलचक प्रवास, त्यातली कोरी जागा, संवादांतले स्वाभाविक विराम, मनातल्या घालमेलीतून उमटणारे अर्धविराम या सगळ्यांना स्वतःची अशी रास्त जागा दिली आहे आणि त्यातला खरेपणा जपला आहे. त्यामुळे तो आताच्या प्रेक्षकांनाही स्वीकारार्ह होतो. वातावरण निर्मिती हा 'वाडा'च्या प्रयोगाचा मुख्य गाभा आहे. या वातावरणाचा पोत वास्तूच्या प्रत्यक्ष दर्शनातून, तिच्यातल्या अंधाऱ्या-अर्धवट उजळणाऱ्या कोपऱ्यांतून, परिसरातून, त्यातल्या नैसर्गिक ध्वनींतून, वेशभूषा-बोलीभाषा यांच्या वापरातून निश्चित होत जातो. कुलकर्णींनी या पोताची अस्सलता जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, इतका की एखाद्या चुकार प्रेक्षकाला संथ गतीमुळे जांभई आली तरी ती त्याला आणि शेजारच्या प्रेक्षकालाही असभ्य वाटेल.
एलकुंचवारांच्या संहितेत संदिग्ध जागा भरपूर आहेत. त्या नुसत्याच संदिग्ध नाहीत तर अर्थगर्भ आहेत. या अर्धवट उजेडाच्या जागांची प्रतिकात्मकता चंद्रकांत कुलकर्णींनी पात्रांच्या हातातल्या कंदिलातून दृश्यमान केली आहे. नाटकाच्या प्रारंभी रंजू आणि प्रभा या कंदिल घेऊन येतात तर आई मरणघरात लावल्या जाणाऱ्या दिव्यासमोर बसली आहे. या तीन बायका वेगवेगळ्या प्रकारे मुक्तीची वाट बघताहेत, हे यातून सूचित होतं. नाटकाच्या शेवटी निराश परागला (भास्करचा मुलगा) वाड्याच्या मध्यभागी दाराच्या चौकटीत पाठमोरा दाखवण्याची कृतीही अर्थपूर्ण ठरते. या परागची नजर मागे ट्रॅक्टरने उध्वस्त होणाऱ्या वाड्याकडे लागली आहे आणि त्याच्या मुक्तीच्या वाटा खुंटल्या आहेत. दागिन्यांचा प्रसंग हा या नाटकातला हायलाईट आहे. दुसऱ्या दिवशी रंजूच्या गमनाबरोबर गायब होणाऱ्या दागिन्यांच्या गोष्टी करत एकीकडे प्रभा आणि आई तर दुसऱ्या बाजूला भास्कर आणि त्याची बायको रात्रीचे स्वप्न बघत बसले आहेत. या दृश्यातल्या क्षणांना प्रकाशयोजनाकार रवी-रसिक यांनी दिलेला उठाव बघण्यासारखा आहे. वहिनी दागिने घालत आरश्यासमोर उभी राहते आणि भास्कर दागिन्यांची यादी वाचतो, त्यानंतर दागिन्यांनी लखलखलेली वहिनी प्रेक्षकसामोरी होते तेव्हा रात्रीच्या अंधारातही रंगमंच उजळतो, या दृश्याचा थरार वास्तववादी नाटकाची ताकद दाखवून देतो आणि तो कलावंत-तंत्रज्ञांसाठीही आव्हानात्मक ठरतो. प्रदीप मुळ्येंच्या असस्ल वाटणाऱ्या वाड्याच्या नेपथ्यातून नाट्य घडवण्याच्या जशा अनेक जागा निर्माण केल्या आहेत तसंच वाड्याच्या लांबी-रूंदीबरोबरच त्याची खोली दाखवून त्यातला अंधार गडद केला आहे. आनंद मोडक यांचं संगीत यथार्थ आहे, पण ते वातावरणातले तपशील अधिक टिपणारं असायला हवं होतं असं नेपथ्य आणि प्रकाशयोजनेचा पोत बघता वाटत राहतं.
वैभव मांगले (भास्कर), प्रसाद ओक (सुधीर), निवेदिता सराफ (वहिनी), प्रतिमा जोशी (प्रभा), भारती पाटील (आई), नेहा जोशी (रंजू), सिद्धेश्वर झाडबुके (चंदू), पौर्णिमा मनोहर (अंजली), अजिंक्य ननावरे (पराग) या सर्वच कलावंतांनी नाटकाची अस्सलता जपण्याची शर्थ केली आहे. प्रत्येकानेच अभिनयशैलीत वास्तववादाचं भान जपण्याची शर्थ केली आहे. हे भान कुठेही सुटत नाही, फक्त बोलीभाषेच्या अस्सलतेवर पुरेशी मेहनत घेतलेली नाही. मात्र नैसर्गिक देहबोली, संवादांच्या देवाणघेवाणीतली सहजता, मौनाच्या जागा यांतला खरेपणा वऱ्हाडी बोलीकडे झालेल्या काहिशा दुर्लक्षावर मात करतो. अर्थात या बोलीचा बाज तितक्याच खरेपणाने आला असता तर प्रयोगाची उंची चार अंगुळे अधिक वाढली असती. या सर्व कलाकारांत निवेदिता सराफ यांनी साधलेल्या लक्षणीय परिणामाची मात्र आवर्जून वेगळी नोंद करावीशी वाटते.
भारती पाटील –
चंद्रकांत कुलकर्णीना देशपांडे कुटुंबाची आई
हवी होती. ती बारीक, ठेंगणी असून चालणार नव्हती. उंच, भारदस्त आवाजाची आणि अंगकाठीची
हवी होती. चार जणांनी माझे नाव सुचवले असे त्यांनी सांगितले. त्यांनी मला साशंकतेनच
विचारले पण त्यांच्याकडे काम करायला कोण नाही म्हणेल. मी लगेच हो म्हणाले. ‘वाडा चिरेबंदी’ला
स्वतःचीच एक पुण्याई आहे. महेश एलकुंचवारांचे लिखाण अप्रतिम आहे. चंद्रकांत सरांच्या
डोक्यात हे नाटक अगदी थ्री-डायमेंशनली फिट आहे. तालमीच्या प्रक्रियेत त्यांनी प्रत्येक
कलाकाराला त्या-त्या भूमिकेतून त्या डायमेंशनमध्ये बसवण्याचा पूरेपर प्रयत्न केला.
अगदी आम्हाला साध्य होईपर्यंत ते समजावून सांगत.
आजही सांगतात कारण त्यांना माहित आहे की हे नाटक जरा जरी हललं किंवा सुटलं
तर त्याचा बॅलंस जातो. त्या डायमेंशनमधून एखादा कलाकार चुकून जरी बाहेर गेला की ते
त्याची गय करत नाहीत. आम्ही सर्वांनी ही सवय स्वःला लावून घेतली आहे. म्हणून
आमच्यासाठी प्रत्येक शो हा खऱ्या अर्थाने प्रयोगचं आहे. आमची फक्त दहा कलाकारांचीच
नाही तर तांत्रिक बाजू सांभाळणारे एक-एक कलाकार मिळून पंचवीस जणांची पूर्ण टीम
आहे. सगळे जण या नाटकाची जबाबदारी पेलण्यासाठी समर्थपणे सज्ज झाले आहेत. सगळ्यांकडून
बरचं काही शिकायला मिळतंय आणि चंद्रकांत कुलकर्णी तर स्वतः एक परिपूर्ण इंस्टीट्युशन
आहेत. आम्ही त्या इंस्टीट्युशनचा एक भाग आहोत याचा आम्हाला आनंदही आहे आणि
अभिमानही आहे.
वाडा चिरेबंदी’चे नेपथ्यकार प्रदीप मुळये यांची प्रतिक्रिया -
आधी त्रिनाट्यधारा केली होती. त्या तीन भागाचं
स्थळ एकच असलं तरी काळ वेगळा आहे. तेव्हा पुढच्या दोन भागांचा विचार करूनच त्याप्रमाणे पहिल्या भागाचे म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’चे नेपथ्य केलं होतं. त्यावेळी विचार करून ठरवलेलं
होतं त्यामुळे आता पुन्हा करताना त्यात फारसा बदल करावासा वाटला नाही. हे नाटक एक
माईलस्टोन आहे. आताचे सगळे कलाकार छान काम करतात. विशेषतः मला आवडला प्रसाद ओक. माझ्या मते खूप क्षमता असलेला तो नट आहे आणि अश्या
भूमिकेमध्ये त्याच्यातील गुणवत्ता दिसून येते. पण त्याला अश्या भूमिका कमी मिळतात असे मला वाटते.
दासू वैद्य यांची प्रतिक्रिया -
महेश एलकुंचवार हे मराठीमधले फार महत्वाचे
नाटककार आहेत. त्याचं लेखन मराठी रंगभूमीला समृद्ध करणारं आहे. त्यांच्या अनेक
नाटकामधील चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेली त्रिनाट्यधारा मी पाहिली आहे. ते एक
वेगळ धाडस होतं. मी विद्यार्थी असताना विजया मेहता यांनी केलेला प्रयोगही पाहिला
होता. विजया मेहता याचं दिग्दर्शक म्हणून मराठी रंगभूमीवर मोठं काम आहे आणि
त्याच्या कार्याचा मराठी रंगभूमीवर एक वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यांनी केलेल्या
प्रयोगाचा मोठा प्रभाव माझ्यावर होता. मी चंद्रकांत कुलकर्णी यांनी नव्या संचात बसवलेला
प्रयोग पाहिला आणि पूर्वीचा प्रभाव बाजूला सारून या प्रयोगाने माझ्यावर नवीन प्रभाव
निर्माण केला. हे या प्रयोगाचं मोठं यश आहे. या नाटकात फार मोठे आरोह-अवरोह नाहीयेत
किंवा फार मोठ्या घटना नाहीयेत. पण वाड्यातील एक कुटुंबातील साध्या, छोट्या-छोट्या
प्रसंगातून, संवादातून, तपशिलातून हे नाटक पुढे जातं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जी
माणसे बांधून ठेवेलेली आहेत, त्यांच्यातील ताण-तणाव किती स्फोटक झाले आहेत हे पाहताना
आपल्याला अंतर्मुख व्हायला होतं. हे यश जसं लेखकाचं आहे तसच ते स्वतंत्र पद्धतीने
रचना करून मांडणाऱ्या दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे आहे आणि आपल्या
अभिनयातून जिवंत असा अनुभव देणाऱ्या सर्व नट मंडळींचे आहे. यामधील काही नट विनोदी
नट म्हणून ओळखले जात असताना त्यांच्याकडून गंभीर पद्धतीचे काम करून घेणं असं एक
वेगळा प्रयोग मला दिसतो. म्हणून अंतर्मुख करणारा फार महत्वाचा असा हा नाट्यप्रयोग
आहे असं मला वाटतं.
अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची प्रतिक्रिया
‘वाडा
चिरेबंदी’ हे नाटक माझं अत्यंत आवडतं नाटक आहे. चंदू ते बसवणार त्यामुळे
त्याच्याबद्दल खूप उत्सुकता होती. मी हे नाटक पाहिले आणि खूप अस्वस्थ झाले.
काहीतरी गुद्मरल्यासारखं होतं ना तसं काही वेळ फिलिंग आलं. हे नाटक पाहण हा एक
वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. हे नाटक पाहताना आपण ७० एम.एम चित्रपट पाहतोय असं
वाटत होतं इतकं हे नाटक भव्य आहे. या नाटकाला ‘अभिजात’ याशिवाय दुसरा शब्द असूच
शकत नाही. एलकुंचवारांच लिखाण उत्कृष्ट आहे. दिग्दर्शन इतकं अप्रतिम आहे की याशिवाय
दुसर असूच शकत नाही असं वाटतं. तसेच या नाटकातील कलाकारांची निवड अचूक आहे.
त्यांची कामे इतकी अप्रतिम झाली आहेत की ते खरेच वाटतात. या नाटकात टिपिकल
मेलोड्रामाटीक असं काही नाहीये. इतक साध-साध असं करत करत हे नाटक तुमच्या आतमध्ये
घुसत जातं आणि तुम्हाला समृद्ध करणारा अनुभव देऊन जातं. मला असं वाटत की हा अनुभव
सगळ्यांनी एकदा घेतलाच पाहिजे.
अभिनेता शशांक केतकर
यांची प्रतिक्रिया
खूप जुनं नाटक आहे आणि अप्रतिम लिखाण आहे.
एक अभिजात नाटक आहे. नाटक बघताना एक सिनेमा बघतोय असं मला वाटल. खूप इमोशनल घटना
आहेत या नाटकात. इतकी वर्ष झाली तरी आजही माणसाच्या त्याच भावना आहेत, त्याच गरजा
आहेत. जेव्हा एक माणूस जातो तेव्हा त्याच्या पुढच्या पिढीमध्ये ज्या गोष्टी घडू
शकतात त्या सगळ्या गोष्टी आजही तश्याच आहेत. परिस्थिती फार बदलली नाही. त्यावेळची
भौगोलिक परस्थिती, आजूबाजूची परिस्थिती वेगळी होती पण माणसाचा स्वभाव आणि भावना या
आजही त्याच आहेत हे पुन्हा एकदा दिसलं. चंदू सरांचे खूप आभार कारण त्यांनी असं
नाटक आज आम्हाला दाखवलं. आमच्या पिढीला अशी नाटकं बघायला मिळाली नाहीत. इतक्या
चांगल्या माणसांमध्ये आज मी छोटासा कलाकार म्हणून वावरतोय. मला याचा खूप अभिमान
आहे की इतक्या चांगल्या माणसाचं मार्गदर्शन मला मिळतंय आणि या सगळ्यांबरोबर काम
करायची माझी इच्छा आहे. सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. नाटकाचे नेपथ्य,
प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत खूप छान आहे. या सगळ्या टीमला माझ्या खूप साऱ्या
शुभेच्छा.
अभिनेत्री प्रतिमा जोशी
‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक माझ्यासाठी अत्यंत
महत्वाचं नाटक आहे. १९९४ साली जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा हे माझं
पहिल नाटक होतं. त्यावेळी मी चंदुला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं आणि नंतर
त्रिनाट्यधारेच्या दुसऱ्या भागात ‘मग्न तळ्याकाठी’ मध्ये मी ‘नंदिनी’चा रोल केला
होता. आता वीस वर्षानंतर मी पहिल्या भागात काम करतेय आणि या नाटकाची वेशभूषा
सुद्धा केली आहे. त्यामुळे ‘वाडा चिरेबंदी’चा मी प्रेक्षक, कलाकार, तंत्रज्ञ असा
वेगवेगळ्या अंगाने अनुभव घेतलाय. या वेळी चंदूने जेव्हा मला ‘प्रभा’ची भूमिका तू कर
असं सांगितलं तेव्हा मला खरं तर खूप आनंद झाला पण त्याच वेळी खूप दडपण पण आलं. चंदुला
माझं व्यक्तिमत्व, आवाज या भूमिकेसाठी सूट वाटला असावा. पण मी दहा वर्षांनी नाटकात काम करत असल्याने
मला मात्र टेन्शन होतं, भीती होती. पण चंदूने हा रोल माझ्याकडून त्याला हवा तसा करून
घेतला. आज जेव्हा लोक मला “तू सरप्राईझ दिलस” असं म्हणतात तेव्हा मला चंदूने का
कास्ट केलं ते कळतंय. बहुतेक हेच वेगळेपण त्याला अपेक्षित असावं. म्हणून माझ्या
निवडीचे शंभर टक्के मार्क दिग्दर्शकाला आहेत. हा रोल करायला मला खूप मजा आली. ‘प्रभा’ची
घुसमट, तगमग खरी वाटली पाहिजे हा चंदुचा कानमंत्र घेऊनच मी ही भूमिका करायचा
प्रयत्न केला. त्याला रसिकांचापण खूप छान प्रतिसाद मिळाला. खूप जणांनी हे पात्र रिलेट
केलं. आमच्या वाड्यात अशी बहीण आहे, आत्या आहे असं सांगितलं त्यामुळे खूप बर वाटल.
या नाटकात काम करणारे बाकीचे सगळे कलाकार मला सिनिअर आहेत. त्यांच्याकडून खूप
बारकावे शिकता आले. आमची एक खूप छान टीम
झाली आहे. त्या टीमवर्कलाच लोकांचा खूप छान प्रतिसादपण मिळतोय. थँक्यू चंदू,
जिगीषा आणि अष्टविनायक; मला पुन्हा एकदा ‘वाडा’ अनुभवायची संधी दिल्याबद्दल.
अभिनेते सचिन खेडेकर यांची प्रतिक्रिया -
त्रिनाट्यधारेपासून माझी चंद्रकांत
कुलकर्णी, महेश एलकुंचवार यांच्याशी ओळख झालेली आहे. तेव्हा झालेले प्रयोग आणि
प्रेक्षकांचा प्रतिसाद हा डोक्यात आहेच. तसच एलकुंचवारांच्या ‘मौनराग’चे प्रयोग
करतानाही प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. ‘वाडा चिरेबंदी’ हे अभिजात नाटक
म्हणून ओळखलं गेलेलं आहे. त्रिनाट्यधारेच्या आधी विजयाबाईंनी ह्या नाटकाचे प्रयोग
केले होते. आत्ता पुन्हा नव्या संचात होत असलेला प्रयोग हा खूप आनंद देणारा आहे.
मला सगळ्यात मोठी जाणवलेली गोष्ट अशी की इतक्या वर्षानीसुद्धा त्या नाटकाच जे गमक
आहे ते कमी झालेलं नाही किंवा त्याची गुणवत्ता जरासुद्धा कमी झालेली नाही. आपण
म्हणतो की प्रेक्षक दर दशकात बदलतो पण जर अभिजात नाटक असेल आणि इतका सकस आणि सशक्त
प्रयोग असेल तर आपले प्रेक्षक प्रत्येक दशकामध्ये तोच प्रतिसाद देतात हे पुन्हा
एकदा ‘वाडा’च्या प्रयोगाने सिद्ध केलं. आत्ता असलेल्या मराठी नाटकांच्या
प्रवाहामध्ये पुन्हा एकदा आठ-दहा जणांची
कास्ट असलेल नाटक करणं हे धाडसच आहे आणि ते ‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’ ह्या
मंडळीनी केलं ह्यासाठी खरं तर त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे कारण आजच्या घडीला
व्यावसायिक नाटकांचे प्रयोग सगळ्या नटांच्या तारखा जमवून करणं ही मोठी सर्कसच आहे.
पण नाटकावर जर प्रेम असेल आणि केलेलं काम आवडत असेल तर हे सहज शक्य होतं हे पुन्हा
एकदा ‘वाडा चिरेबंदी’ने करून दाखवलं. मला व्यक्तिशः सगयांची कामं खूप आवडली. वैभव
मांगले आणि निवेदिता हे सिनिअर आणि सकस नट आहेतच, प्रसाद ओक, पूर्णिमा ओक यांची
कामे उत्तम झाली आहेत. नेहा जोशी ही नव्या दमाची नायिका, तिने मंजूचं काम उत्तम
केलं. प्रतिमा जोशी ही त्रिनाट्यधारेपासूनची साथीदार आहे, तिने केलेलं ‘प्रभा’च
काम, भारतीचं काम, अजिंक्यचं काम सुद्धा अप्रतिम आहे. ह्या सगळ्यांचा एकसंध परिणाम
ह्या प्रयोगामध्ये उभा राहतो. चंद्रकांत कुलकर्णी हा गेले वीस वर्ष मराठीमध्ये
आघाडीचा दिग्दर्शक म्हणून आहे. त्याचं महेश एलकुंचवार आणि ह्या नाटकावर असलेलं
प्रेम ठायी ठायी आणि पुन्हा पुन्हा जाणवतं. ह्या टीमला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
अभिनेते संदीप कुलकर्णी यांची प्रतिक्रिया
-
‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग खूप आवडला. मी
विजयाबाईंनी केलेला प्रयोग पाहिला होता. तसेच चंद्रकांत कुलकर्णीची त्रिनाट्यधारा
पाहीली होती. पण आत्ता परत पाहताना काही गोष्टी नव्याने आवडल्या. उत्तम नाटकं ही
कधीच आउटडेटेड होतं नाहीत, तसचं हे उत्तम नाटक आहे. अजूनही भाऊबंदकी, नातेसंबंध,
त्यातील भौगोलिक स्थान, सामाजिक स्थान हे सगळचं त्या नाटकात आहे. एवढ्या सगळ्या
गोष्टी एका नाटकात सहजपणे येण हे अप्रतिम आहे. तितक्याच सहजतेनं चंद्रकांतने ते
दिग्दर्शित केलंय. काही क्षण इतके इफेक्टिव आहेत ते लक्षात राहतात. उदाहरणार्थ
रंजूचे वडील तिला ओढत घेऊन जातात. मला नाटकाचा शेवट खूप आवडला. नाटक संपल्यावर तो क्षण तुमच्याबरोबर राहतो. विझ्युअली
पण राहतो आणि एक फील म्हणूनसुद्धा राहतो. भाऊ निघताना धाकटा भाऊ त्याला हाक मारतो
आणि तो वळून एक-दोन मिनिट थांबतो, पराग उठून त्या मधल्या दारामध्ये जातो ह्या
सगळ्या मुवमेंट इतक्या सहज झाल्यात आणि त्या विझ्युअली आणि फीलवाईज लक्षात राहतात.
सगळ्यांनी उत्तम कामं केली आहेत. अशा नाटकांमध्ये एक इल्यास्टीसिटी असते त्या
पात्रांमध्ये, त्या नात्यांमधली. त्याला बरोब्बर गोवणं किंवा धरून ठेवणं हे फार
महत्वाचं असतं तो ठेहराव आवश्यक असतो, तो प्रेक्षकांना छान असा ओढून घेतो आतमध्ये,
मग तुम्ही त्या जगातच जाता आणि तुम्हाला तो अनुभव मिळतो. अलीकडच्या फार कमी
नाटकांमध्ये असा अनुभव मिळतो. त्या घरामध्ये तुम्ही वावरताय किंवा राहताय असा
अनुभव मिळतो. चंद्रकांतने ‘ध्यानीमनी’ करतानासुद्धा अश्या बारीक बारीक गोष्टी
उभ्या केल्या होत्या की लोकांना तो अनुभव मिळायचा. वाडा सारख्या चांगल्या
नाटकांमध्ये लिखाणात तो अनुभव असणं आणि लोकांपर्यंत तो पोहोचवणं हे काम दिग्दर्शक,
कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी उत्तम रीतीने केलं आहे.
रेड एफ.एम ९३.५ वर निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया
–
सुरुवातीला मला नाटकातील भाषेबद्दल खूप
टेन्शन होतं. मी शहरी वातावरणात वाढले असल्याने फार काही खेडेगावात गेले नव्हते.
मी ही माणसं बघितली नाहीत. मी तश्या प्रकारच्या भूमिकाही केलेल्या नाहीत.
त्यातल्या त्यात कोल्हापूरकडच्या केलेल्या आहेत. म्हणून मी माझी पाटी पूर्णपणे
कोरी ठेवून चंदू सांगेल तसे केले. चंदू भूमिका छान समजावून सांगतो आणि तो
तुमच्याकडून ते काढून घेतो. मला असं वाटत की प्रत्येक कलाकाराने एकदा चंदूबरोबर
काम कराव. पहिल्यांदा जेव्हा मी नाटकाच्या वाचनाला गेले, तेव्हा चंदूने हे नाटक
इतकं अप्रतिम वाचलं. खूप छान नाटक आहे. अगदी परफॉर्मन्स पॅक. सगळ्या कलाकारांची
कामे खूप छान झाली आहेत. मी सर्व कलाकारांकडून खूप काही शिकते आहे. सर्वांनी हे
नाटक जरूर बघा. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन हे नाटक एक वेगळी अनुभूती देतं.
अभिनेते सुनील बर्वे
यांची प्रतिक्रिया
मी ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक पाहिले आणि
खरच खूप आनंद झाला कारण त्रिनाटयधारा केली होती त्याच्या स्मृती थोड्या पुसट
झाल्या होत्या. फक्त एव्हडच माहीत होतं की वाडा संस्कृतीतल्या किंवा एकत्र
कुटुंबपद्धतीतल्या प्रत्येकाची वाटचाल कशी वेगवेगळी असते, प्रवृत्ती कशा असतात.
मी हे नाटक पाहिल्यानंतर पुन्हा एकदा
त्याच्या प्रेमात पडलो. ह्याच कारण मुळात मला वाडा संस्कृतीविषयी किंवा एकत्र कुटुंबपद्धतीविषयी
अतोनात कुतूहल होतं. ही वाडा संस्कृती आता
का विखुरलेली दिसते याविषयी मला कुतूहल होतं. माझ्या वडिलांकडून ह्या गोष्टी मी खूप
ऐकल्या आहेत.
तेव्हाची माणसं, त्यांच्या वृत्ती,
त्यांची स्वप्न, त्यांच्यातील हेवेदावे हे सर्व इतक्या अप्रतिम पद्धतीने महेश एलकुंचवारानी
मांडलय की कळत माणूस कुठल्याही काळातला असला तरी त्याची वागण्याची, विचार करण्याची
पद्धत मात्र सारखीच आहे. म्हणजे तेव्हा सुद्धा एखाद्याला आपल्या भावाचा झालेला
उत्कर्ष खटकायचा, एखादा माणूस बायकोच्या विचाराने विचार करायचा, सोनंनाणं दागिने
याच्या लोभापायी माणूस आपल्या भावाशी खोटेपणा करू शकतो हे त्या नाटकात दिसत. फिल्मी
दुनियेचं असलेल आकर्षण, त्यापायी वेडी होणारी ती मुलगी आणि त्यातून तिचं घसरणं हे पाहिल्यानंतर
असं लक्षात येतं की आपल्याला असं जरी वाटत असला की आपण पुढारलेले आहोत तरी माणूस
म्हणून आपण मागेच आहोत. सभोवतालची परिस्थिती थोडी बदललेली असली तरी माणसाची वृत्ती अजूनही तशीच आहे.
मला हे नाटक खूप आवडलं. खरचं निवेदिता, प्रसाद,
वैभव, प्रतिमा, नेहा, पूर्णिमा, भारती, सिद्धेश्वर, अजिंक्य....सगळ्या सगळ्या कलाकारांचा
परफॉर्मन्स खूप ग्रेट होता. निवेदिताला मी पहिल्यांदा अश्या भूमिकेत पाहिलं आणि मी
खूप इम्प्रेस झालो. मला तिचं काम खूप आवडलं. महेश एलकुंचवारांनी जितक्या
उत्तमरीतीने हे नाटक लिहिले आहे तितक्याच ताकदीने चंदू कुलकर्णीने त्याच्या नटांच्या
आणि तंत्रज्ञांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत ते सर्व पोहोचवलं. एक संपूर्ण
नाट्यकृती पाहिल्याचा अनुभव दिल्याबद्दल सर्व टीमचे आभार आणि खूप खूप अभिनंदन.
सुप्रसिद्ध
अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची प्रतिक्रिया
वाडा चिरेबंदीचा हा प्रयोग मी पहिला जो
एका नव्या संचात चंद्रकांत कुलकर्णींनी साकारलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा
प्रयोग मला एक ‘एपिक’ असं वाटतय कारण एक तर कित्येक वर्षांपूर्वीच हे नाट्य, नाट्य
म्हणजे ज्यात भरपूर ड्रामा आहे असं नाट्य, नाटक स्वरुपात सादर झालेल आहे आणि इतक्या
वर्षांपूर्वीची ही कलाकृती इतक्या सुंदररीत्या ह्या सर्व कलाकारांनी चंद्रकांत
कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जी सादर केली आहे ती अविस्मरणीय आहे. एक वेगळ्या
प्रकारचा Hangover हे नाटक पाहिल्यानंतर नक्कीच राहतो आणि बऱ्याचश्या लोकांची
प्रतिक्रिया अशीही आहे की हे नाटक अंगावर येतं. माणूस भावूक होतो आणि त्यातील जे
इमोशन आहे ते अंगावर येतं, इन अ पॉझीटीव्ह मॅनर. मला असं वाटत की हे यश आहे या
सर्व लोकांचं. अशा प्रकारे आजच्या तारखेलासुद्धा या गंभीर नाटकाला इतकी गर्दी होते,
त्यामुळे कुठेतरी चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक स्वीकारतात याचा विश्वास
जास्त वाढतो. माझ्या अनेक शुभेच्छा.
अंजली आंबेकर यांची प्रतिक्रिया -
वाडा चिरेबंदी: एक सार्वत्रिक वाडानुभव
नीता पानसरे वाळवेकर यांची प्रतिक्रिया -
वाडाचिरेबंदी ! ! एक अविस्मरणीय अनुभव.
३ जाने रोजी औ,बादच्या सिडको नाट्य गृहात सिद्धाऩ्त फाउंडेशन या माझ्या संस्थेतर्फे मी वाडाचिरेबंदी या नाटकाचे अयोजन केले होते. .रसिकांनी याला भरभरुन प्रतिसाद दिला. .उत्कृष्ट दिग्दर्शन,सहज सुंदर अभिनय ,नेटक नेपध्य व संगित या मुळे वाडाचिरेबंदी बघण संस्मरणिय अनुभव होता .ही रसिकाना नवर्वषाची अप्रतिम भेट होति.............
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ---वाडाचिरेबंदी नाटक रसिकांनी एकदा तऱी पहावे, अनुभवावे.......
वाडाचिरेबंदी ! ! एक अविस्मरणीय अनुभव.
३ जाने रोजी औ,बादच्या सिडको नाट्य गृहात सिद्धाऩ्त फाउंडेशन या माझ्या संस्थेतर्फे मी वाडाचिरेबंदी या नाटकाचे अयोजन केले होते. .रसिकांनी याला भरभरुन प्रतिसाद दिला. .उत्कृष्ट दिग्दर्शन,सहज सुंदर अभिनय ,नेटक नेपध्य व संगित या मुळे वाडाचिरेबंदी बघण संस्मरणिय अनुभव होता .ही रसिकाना नवर्वषाची अप्रतिम भेट होति.............
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ---वाडाचिरेबंदी नाटक रसिकांनी एकदा तऱी पहावे, अनुभवावे.......
शैलेश दातार
मी लहान असताना खूप वर्षांपूर्वी ओरिजिनल
कास्ट मध्ये हे नाटक पाहिलं होतं आणि त्यातले काही प्रसंग मला आठवत होते. विशेषतः
तो दागिन्यांचा प्रसंग जो नाटकाचा हायलाईट आहे. पुन्हा नाटक पाहताना पूर्ण आठवत
होतं अस नाही, त्याची माहिती होती. मी गेल्या तीन चार वर्षांमध्ये दोन महत्वाची
जुनी नाटकं केली असल्याने त्याचं काय प्रेशर असत याचा मला अंदाज होता. परंतु हे
नाटक बघताना जी काय मजा आली आहे त्याला खरच काही तोड नाही. महेश
एलकुंचवारांसारख्या एका मोठ्या नाटककाराने लिहिलेलं एक वेगळ नाटक. खरोखर अशा
विषयावर सुद्धा नाटक होऊ शकत अशी कल्पना कुणी करणार नाही. लेखकाच हे खरच मोठेपण
आहे. मी विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक पाहिलं होतं. अर्थात तेव्हा मी लहान
असल्याने दिग्दर्शन कळतंय असा काही भाग नव्हता. आता बघताना सगळ्यात महत्वाची गोष्ट
जाणवली ती म्हणजे प्रत्येक पात्राने त्या नाटकात जे काही योगदान दिलय ना त्याला
काही तोडच नाही. कारण त्यातल्या प्रत्येक कलाकाराची जातकुळी वेगळी आहे. ते वेगवेगळ्या
गोष्टींसाठी आज ओळखले जात आहेत. म्हणजे
त्याचं स्वत:चं नाव तर आहेच असं असताना प्रत्येकाने त्या नाटकाच्या जातकुळीशी इतकं
एकरूप होऊन काम केलंय की त्याचं श्रेय कलाकारांबरोबर चंदुलाही आहे. विशेष कौतुक
मला करावस वाटत वैभवच कारण केवळ विनोदी नट असल्याचा निष्कारण आळ आलेला तो अत्यंत
एक अष्टपैलू नट आहे आणि हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. विशेषतः त्यातली जी
बोली आहे त्या बोलीसाठी तो बिलकुल ओळखला जात नाही. खरं तर तो कोकणातला आहे. विदर्भी
बोली इतक्या सहजतेने बोलणं हे खूप अवघड आहे कारण त्या बोलीचा सराव नसेल तर ते कठीण
जातं, खोट वाटू शकत. निवेदीता ताईना अशा वेगळ्या नाटकात आणि वेगळ्या रुपात बघण हे
अत्यंत सुखद होतं, खूप गोड काम केलंय त्यांनी. नेहाने फार सुंदर काम केलंय कारण
तिची भूमिका तिच्या आताच्या वयापेक्षा कमी वय असलेल्या मुलीची भूमिका आहे.या
भूमिकेला खूप एनर्जी लागते. प्रसाद नेहमीप्रमाणे खूप सहज वावर आणि सुंदर काम करतो.
सिद्धेश्वरने अजिबात संवाद नसलेली भूमिका छान केली आहे. मला सरप्राईझ पॅकेज अर्थात
प्रतिमा जोशी होती. तिला मी काम करताना पाहिलं नव्हत. तिला चॅनेलमध्ये काम करणारी,
दिग्दर्शन करणारी म्हणून तिला मी ओळखतो. तिने प्रभाची अवघड भूमिका खूप छान केली
आहे. अजिंक्यने मुलाची भूमिका छान केली आहे. सगळ्या कलाकाराचं काम छान झालं आहे.
चंदूचही अर्थात कौशल्य आहेच. गेली पंचवीस वर्ष तो इतकी छान नाटकं आणतोय. आपल्या
माणसाचं काम बघताना आपल्यावरच एक दडपण असत तसं हे नाटक बघताना माझ्यावर दडपण होतं.
नाटक खूप आवडलं. एक अत्यंत आशयघन आणि सुंदर नाटक दिल्याबद्दल निर्मात्यांचे,
चंदूचे आणि सगळ्या टीमचे आभार मानतो. हे नाटक प्रत्येकाने बघायला हवं. काळानुसार
बदलत जाणारे नातेसंबंध, त्यातले तणाव, त्यात घडणाऱ्या गोष्टी आणि पुन्हा त्या संबंधांच
महत्व. आज आपण जरी पैशाच्या, सुखाच्या मागे लागत असलो तरी शेवटी ते नातेसंबंध
आपल्याला तारत असतात, जपत असतात आणि राहत असतात हे एका खूप वेगळ्या पद्धतीन सांगणारं
हे नाटक मला खूप आवडलं. पुन्हा संधी मिळाली तर मी जरूर बघणार आहे कारण प्रत्येक
वेळा बघताना काहीतरी वेगळ मिळेल याची मला खात्री आहे. माझ्या सगळ्या मित्रांना
मन:पूर्वक शुभेच्छा. निर्मात्यांचही अभिनंदन एक चांगली कलाकृती आणल्याबद्दल कारण
आजच्या दिवसात अशी कलाकृती आणणे याला धाडस लागतं. एक छोटीशी तक्रार...अशा नाटकामध्ये
मला का नाही घेत? मलाही काम करायला आवडेल J हा माझा निरोप निर्माते
आणि दिग्दर्शकांपर्यंत पोहोचावा एवढीच इच्छा आणि पुन्हा एकदा सगळ्यांच अभिनंदन.
आनंद इंगळे
वाडा चिरेबंदी हे नाटक मी आधीही पाहिलं
होतं आणि पुन्हा आता पाहिलं. तितकाच आनंद, समाधान आणि अस्वस्थता पुन्हा एकदा
अनुभवायला मिळाली. एलकुंचवारांच एक अतिशय उत्कृष्ट नाटक आहे. या नाटकात दिग्दर्शक
चंद्रकांत कुलकर्णी यांचा खूप मोठा वाटा आहे. नाटकाचा प्रयोग हा ‘गोळीबंद’ होतो.
नाटकातल्या सर्व कलाकारांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आहे. तरीही मुद्दाम नाव
घ्यायचं झालं तर ‘सुधीर’ची भूमिका करणारा प्रसाद ओक याचं नाव घ्यायला लागेल.
अर्थातच माझे मित्र वैभव मांगले उत्तम काम करतात. मला वैभवच कौतुक अशासाठी करावस
वाटत कि मुळात तो कोकणातला असूनसुद्धा संपूर्ण व्हराडी भागाच काम त्याने केल आहे
आणि माझ्यामते तो खूप जास्त प्रमाणात यशस्वी झाला आहे कारण मुळात तो एक अभ्यासू नट
आहे. सगळे कलाकार एक दर्जेदार अनुभव देतात हि फार महत्वाची गोष्ट आहे. अलीकडे विनोद
म्हणजेच मनोरंजन अशी अवस्था सध्या सगळीकडे असताना, मनोरंजनाचे अजूनही काही
दर्जेदार प्रकार असू शकतात हे सिद्ध करण्यासाठी या नाटकाच उदाहरण आपल्याला देता
येईल इतकं महत्वाच हे नाटक आहे. सगळे कलाकार प्रेक्षकांना पुन्हा रंगभूमीकडे
वळवण्याचे काम करत आहेत असे मला वाटते. या नाटकाच्या सर्व टीमला माझ्या मन:पूर्वक
शुभेच्छा. हे नाटक प्रत्येकाने जरूर पहाव. एक उत्तम नाट्यानुभव घेण्यासाठी
नाट्यरसिकांना हि एक पर्वणी आहे.
अभिनेत्री - सुप्रिया पिळगावकर
अभिनेत्री - अमिता खोपकर
‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक माझ्या हृदयाच्या
फार जवळचं नाटक आहे कारण बरेच वर्षांपूर्वी विजयाबाईंनी हे नाटक केलं होतं आणि
आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही तो प्रयोग पहिला होता. आत्ताचे कलाकार हे सर्व आमचे
मित्रमंडळीच आहेत आणि त्यांचा प्रयोग बघताना मला एकदम नॉस्टॅल्जिक झालं होतं.
चंदूने इतक्या सुंदर पद्धतीने हे नाटक बसवलं आहे की आपण त्या काळामध्ये जाऊन
पोहोचतो. असे वाटते कि आपण तिकडेच आहोत, त्यांच्यामधेच बसलो आहोत. सगळ्या
कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे. फार आनंद झाला एक चांगलं नाटक बघून.
अभिनेत्री – प्रिया
बेर्डे
बोलयाला शब्द अपुरे आहेत. ‘वाडा
चिरेबंदी’ नाटकाचे सगळे कलाकार इतके छान काम करतात कि वाटतच नाही आपण नाटक बघतो
आहोत. नाटक बघताना आपलं लक्ष जराही विचलित होतं नाही आणि आपण त्या नाटकामध्ये,
त्या पात्रांमध्ये गुंतून जातो. चंदू ‘हॅटस ऑफ टू यु’. सर्वाना माझ्याकडून
शुभेच्छा.
वैभव मांगले -
‘वाडा चिरेबंदी’ नाटक माझ्यासाठी अत्यंत
महत्वाचं नाटक आहे. माझ्या कारकिर्दीसाठी महत्वाचं नाटक आहे. मला अनेक वर्ष गंभीर
नाटक करायचं होतं. कारण मुळात मी जे अगोदर नाटक केलं ते गंभीर प्रकृतीचं नाटक
होतं. विनोदी नाटक मी मुंबईत आल्यानंतर करू लागलो. त्या पद्धतीची नाटकं मला करायला
आवडतात. ‘
वाडा’ माझ्यासाठी एक महत्वाचं नाटक आहे
कारण ते अभिजात नाटक आहे. त्याच्यातील जी समस्या आहे ...म्हणजे मानवी भावभावना,
एकत्र कुटुंबामध्ये असणारा प्रेमाचा धागा आणि त्याच बरोबरीने त्यात असणारे
ताण-तणाव हे सगळ फार महत्वाचं आहे या नाटकामध्ये आणि एलकुंचवारांनी ते अत्यंत
तरलपणे दाखवलं आहेत, मांडलं आहे.
नाटक बघताना तुम्हाला जाणवेल कि एखादा भाऊ
दुसरयाचं म्हणण ऐकून घेत असतो तेव्हा ऐकून घेणारा भाऊ चुकीचा वाटत असतो. बोलणारा
माणूस बरोबर वाटत असतो. त्या त्या प्रसंगात कोणीतरी व्हिलन वाटतं आणि कोणीतरी हिरो
वाटतं, कोणीतरी बरोबर वाटतं आणि कोणीतरी चुकीचं वाटतं. पण जेव्हा नाटक संपतं
तेव्हा तुम्हाला जाणवतं कि कोणीच चुकीचं नाहीये. सगळेच बरोबर आहेत त्यांच्या
दृष्टीने. हे एका नाटकात दाखवणं अत्यंत महत्वाचं आहे. एलकुंचवार हे फार मोठे लेखक
असल्याने त्यांनी हे फार छान पद्धतीने लिहिले आहे.
मला या नाटकात करण्यासारख्या खूप गोष्टी
आहेत. एक तर भाषा. मला वाटते कि कुठल्याही नटाला किमान तीन-चार बोलीभाषा यायला
पाहिजेत. प्रत्येक भाषेचा एक सूर असतो, त्याच्यात एक गाणं असत, ते गाणं कळलं तर तुम्हाला
भूमिका कारण सोपं जातं आणि त्यातली मजा जास्त घेऊ शकता. अशी मजा तुम्ही घेतलीत तर
लोकांना देता येते. आणि अभिनेत्याला एकदा सूर कळला कि मग तो कुठलही काम करू शकतो.
चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे काम करायची
माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. आज मी हे छातीठोकपणे सांगू शकतो कि चंद्रकांत
कुलकर्णी हे मराठी रंगभूमीवरील दिग्दर्शकांचा ‘बादशाह’ आहेत. त्यांना नाटक आतून
बाहेरून माहित असत. नाटकं हे दृश्यमाध्यम आहे आणि हे नाटक त्रिमितीतलं आहे आणि म्हणून
हे नाटक सुंदर दिसण्यासाठी, सुंदर ऐकू येण्यासाठी त्या त्रिमितीत काय काय गोष्टी करायला
हव्यात यासाठी चंद्रकांत कुलकर्णी सगळ्या प्रकारे परम्युटेशन-कॉम्बिनेशन करत
असतात.
त्यांच्या बरोबर नाटक करणं म्हणजे नटासाठी
मोठा एक्सरसाईज असतो त्यामुळे नट तयार होतो. हे नाटक माझ्यासाठी, माझ्यातल्या
नटासाठी, माझ्यातल्या माणसासाठी छान सर्व्हिसिंग होतं. त्यामुळे मला फार मजा आली.
सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना मजा आली. माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये हि
एक अविस्मरणीय भूमिका आहे.
सिद्धेश्वर झाडबुके -
वीस वर्षांपूर्वी त्रिनाट्यधारा जेव्हा
पुण्याला आली होती तेव्हा आमच्या ग्रुपने बघितली होती आणि आम्हाला खूप आवडली होती.
तेव्हा आम्हाला धक्का बसला होता कि अशा प्रकारचं नाटक असू शकतं. आता काम करत
असताना जाणवलं कि या नाटकातील गोष्ट हि ठराविक ठिकाणची गोष्ट नाहीये. तर अशी
पात्रं, अश्या व्यक्ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटत असतात. नाटककार महेश एलकुंचवार
यांनी सगळ्या पात्रांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला आहे. व्यक्ती चित्रण अप्रतिम
आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हाताखाली काम करणं हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट
आहे. कलाकाराच्या दृष्टीने हे नाटक म्हणजे
अभ्यास आहे. या नाटकात आणि चंद्रकांत कुलकर्णींच्या हाताखाली काम केल्यावर
कुठल्याही कलाकाराला कळेल कि आपण किती पाण्यात आहोत. मी या नाटकात ‘चंदू’ ची भूमिका
करतोय ती खूप छान आहे. ते पात्र न बोलता बराच काही बोलुन जातं. प्रत्येक घरात अशी
कुठली एक म्हातारी व्यक्ती असते कि तिला आपण लहान मुलासारख सांभाळत असतो, तिची सेवा
करत असतो. अशी सेवा करणारं ‘चंदू’ सारखं कुणीतरी लागतं. मी आणि प्रसाद ओक जवळ-जवळ
अठरा वर्षानंतर एकत्र काम करतोय. सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना मजा आली.
अजिंक्य ननावरे –
मी ‘वाडा चिरेबंदी’ बद्दल खूप ऐकले होते
पण हे नाटक कधी पाहायला मिळाले नव्हते. चंद्रकांत कुलकर्णी सरांनी परागच्या भुमिकेसाठी
माझी निवड केल्यावर तर मला अतिशय आनंद झाला. मी मुळचा साताऱ्याचा. मी वाड्यात
राहिलो होतो त्यामुळे या नाटकातील पात्रे खूप जवळची वाटतात. हे माझं पहिलाच
व्यावसायिक नाटक आहे. सगळे मोठे कलाकार या नाटकात आहेत. त्यांच्याकडून खूप शिकायला
मिळालं. तालीम करताना चंदूसरांकडून खूप शिकायला मिळालं. वाडा चिरेबंदी गतवास्तवाचा लख्ख आरसा
(लोकसत्ता ३० नोव्हेंबर २०१४ - रवींद्र पाथरे )
वयोमानपरत्वे डोळे आणि कान गेलेली तात्याजींची आई- दादी अंथरूणाला खिळून आहे. तात्याजी गेलेले तिच्या गावीही नाही. ती सतत त्यांच्या नावानं हाका मारत असते. नवरा गेल्यानं परस्वाधीन झालेल्या आईला काळजी आहे ती चंदू आणि प्रभाची. त्यांचं कसं होणार, या चिंतेनं तिचं काळीज तीळतीळ तुटतंय. त्यात भास्करचा मुलगा पराग शिक्षण अर्धवट सोडून गावात उंडारक्या करत फिरतोय. तो दारूच्या आहारी गेलाय. भास्करची वयात आलेली मुलगी रंजू हिंदी सिनेमानं नादावलीय. तिच्या मॅट्रिकच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यातून पार होण्यासाठी गावातल्या एका तरुण मास्तरची शिकवणी तिला लावलीय. पण तिची वेगळीच थेरं सुरू आहेत. भास्करची बायको- म्हणजे घरातली थोरली सून 'आता घरावर आपलंच राज्य' आल्याच्या तोऱ्यात वावरतेय. सुधीरची बायको अंजली ही कोकणस्थ असल्यानं देशस्थांच्या या घरात तिला गुदमरल्यासारखं होतं. तिच्या कोकणस्थपणावर जो-तो येता जाता टोमणे देत असतो.
नाटककार महेश एलकुंचवार यांनी पन्नासेक वर्षांपूर्वी सरंजामशाहीचं प्रतीक असलेल्या 'वाडा संस्कृती'च्या पतनाचं तसंच स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या सामाजिक-आर्थिक पर्यावरणामुळे वेगानं विघटनाकडे निघालेल्या कुटुंबसंस्थेचं वास्तवदर्शी चित्रण करण्यासाठी 'वाडा चिरेबंदी' हे नाटक लिहिलेलं असलं, तरी त्याचं नाव मात्र त्यांनी 'वाडा चिरेबंदी' असं का ठेवावं, कळायला मार्ग नाही. खरं तर या नाटकात वाडय़ाचे आणि वाडा संस्कृतीचे चिरे ढासळताना दाखवले आहेत. कोणत्याही क्षणी हा वाडा त्यातल्या माणसांच्या ताणलेल्या नातेसंबंधांसह जमीनदोस्त होण्याची भीती पडछायेसारखी नाटकभर व्यापून राहिली आहे. तसं स्पष्ट सूचन एलकुंचवारांनी केलेलं आहे. तरीही या वस्तुस्थितीशी पूर्ण विसंगत असं नाव नाटकाला देण्यामागे काय कारण असावं बरं? असो. या प्रश्नाचं उत्तर एलकुंचवार कधीतरी देतीलच.
..तर हे 'वाडा चिरेबंदी' एलकुंचवारांच्या पंच्याहत्तरीचं निमित्त साधून पुनश्च रंगभूमीवर आलं आहे. सलग आठ तासांची 'वाडा' नाटय़त्रयी सादर करणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी यांनीच ते दिग्दर्शित केलेलं आहे. अभिजात नाटकांचं पुन:पुन्हा मंचन होणं हे नव्या पिढीला गतेतिहासाशी परिचित करून देण्याकरता आवश्यक असतं. हा हेतू यामुळे पूर्ण होतोच; शिवाय उत्तम वास्तववादी नाटकाचा वानवळाही यानिमित्ते प्रेक्षकांच्या नव्या पिढीसमोर ठेवला गेला आहे.
कधीकाळी विदर्भातले बडे जमीनदार असलेल्या धरणगावकर देशपांडय़ांचं ते वैभव बदलत्या काळाबरोबर लयास गेलं आहे अशा कालखंडात हे नाटक घडतं. जमीनदार. त्यात देशस्थ ब्राह्मण. त्यामुळे जन्मजात मिजासी वृत्ती अंगी बाणलेली. कष्टांची सवय नाही. हुकूम सोडणं तेवढं माहीत. परंतु कालौघात काप गेले अन् भोकं उरली तरी ताठा कमी झालेला नाही. वाडय़ासमोर पडीक ट्रॅक्टर पांढऱ्या हत्तीगत फुकाचा पोसलेला. तोही आता गंज चढून धारातीर्थी पडण्याच्या अवस्थेत. अशा धरणगावकर देशपांडय़ांच्या घरातले कर्ते पुरुष तात्याजी वृद्धापकाळानं मरण पावलेत. मुंबईला असलेला मधला मुलगा सुधीर वगळता देशपांडे कुटुंब गावातच वास्तव्य करून असलेलं. सुधीरला कळवूनही तो अंत्यसंस्कारावेळी पोहोचू शकला नव्हता. आता दिवसकार्यासाठी सुधीरची वाट बघणं सुरू आहे.
सुधीर बायको अंजलीसह गावी पोहोचतो तेव्हा चार दिवस उलटून गेलेत. तात्यांच्या जाण्यानं घरावर सुतकी कळा असली तरी आईशिवाय इतरांना फारसं दु:ख झालेलं नाही. तात्यांच्या हयातीत घरातल्या कुणाचंच त्यांच्यापुढे चालत नसे. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं सर्वानी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडलेला. प्रत्येकजण आता आपल्याला हवं ते करायला मोकळा झालेला. अशात सुधीर-अंजली तिथं पोहोचल्यावर साहजिकच पुढची इस्टेटीची निरवानिरव लावली जावी अशी प्रत्येकास आस लागून राहिलेली. शिक्षणासाठी आसुसलेली, पण तात्याजींच्या जमीनदारांच्या तथाकथित इभ्रतीपायी कॉलेजशिक्षण घेऊ न शिकलेली आणि मनाजोगता मुलगा सांगून न आल्यामुळे लग्नाविना राहिलेली प्रभा आपल्या वाटय़ाला येणारे दागिने विकून पुढचं शिक्षण करू इच्छितेय. तर घरात खालमानेनं घरगडय़ासारखा राबणारा धाकटा चंदू गावात दुकान टाकावं म्हणतोय. (आईकडे त्यानं तशी इच्छा व्यक्त केलीय. बाकी कुणाकडे बोलायची त्याची शामत नाही.) आता घराची सूत्रं हाती आलेल्या थोरल्या भास्करला आपलं आयुष्य गावात वाया गेलं असं वाटतंय. त्यामुळे घरचा सगळा जमीनजुमला आणि पिढीजात दागदागिने आपल्याच पदरी पडावेत अशी त्याची मनिषा आहे. मात्र, सुधीरला आपला वाटा हवा आहे. वडिलांचं श्राद्ध जमीनदारांच्या इभ्रतीला साजेसं व्हायला हवं असं भास्करचं म्हणणं. पण वाण्याची उधारी थकल्यामुळे तो आणखी उधार द्यायला तयार नाही. त्यानं वाडय़ाचा मागचा भाग विकत मागितलाय. (जो आईच्या वाटय़ाचा आहे!) तो विकून येणाऱ्या पैशांत श्राद्धविधी उरकायची तजवीज भास्करनं आधीच करून ठेवलीय. सुधीरला ते मान्य नाहीए. परंतु आपल्या खिशातून दमडी काढायला तोही राजी नाही. शेवटी आईच आपला भाग विका म्हणून सांगते आणि घरातली भांडणं चव्हाटय़ावर आणायचं टाळते..
वयोमानपरत्वे डोळे आणि कान गेलेली तात्याजींची आई- दादी अंथरूणाला खिळून आहे. तात्याजी गेलेले तिच्या गावीही नाही. ती सतत त्यांच्या नावानं हाका मारत असते. नवरा गेल्यानं परस्वाधीन झालेल्या आईला काळजी आहे ती चंदू आणि प्रभाची. त्यांचं कसं होणार, या चिंतेनं तिचं काळीज तीळतीळ तुटतंय. त्यात भास्करचा मुलगा पराग शिक्षण अर्धवट सोडून गावात उंडारक्या करत फिरतोय. तो दारूच्या आहारी गेलाय. भास्करची वयात आलेली मुलगी रंजू हिंदी सिनेमानं नादावलीय. तिच्या मॅट्रिकच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यातून पार होण्यासाठी गावातल्या एका तरुण मास्तरची शिकवणी तिला लावलीय. पण तिची वेगळीच थेरं सुरू आहेत. भास्करची बायको- म्हणजे घरातली थोरली सून 'आता घरावर आपलंच राज्य' आल्याच्या तोऱ्यात वावरतेय. सुधीरची बायको अंजली ही कोकणस्थ असल्यानं देशस्थांच्या या घरात तिला गुदमरल्यासारखं होतं. तिच्या कोकणस्थपणावर जो-तो येता जाता टोमणे देत असतो.
तात्याजींच्या कार्याच्या निमित्तानं एकत्र आलेल्या या सर्वाच्या आपापसातील गुंतागुंतीच्या, ताणलेल्या संबंधांचं सूक्ष्म, तरल चित्र एलकुंचवारांनी 'वाडा'मध्ये रंगवलं आहे. अनेक पातळ्यांवर त्यांनी हे नाटक खेळवलेलं आहे. वाडय़ाबाहेरचं सामाजिक-आर्थिक पर्यावरणही या ना त्या मार्गानं नाटकात सूचकपणे येत राहतं आणि एक समग्र जीवनानुभव त्यातून उभा ठाकतो.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वैदर्भीय जमीनदार कुटुंबातील अंतर्गत ताणतणावांसह तत्कालीन भवताल त्याच्या रंग, रूप, रस आणि गंधासह प्रयोगात समूर्त केला आहे. यातले फॅन्टसीसदृश्य प्रसंग त्यांनी तरलतेनं हाताळले आहेत. यातली पात्रं खरं तर दुष्ट नाहीयेत. त्यांच्यातले ताणतणाव हे मानवी स्वभावातील खाचाखोचा, संस्कारांतून आलेली मानसिकता, रीतीरिवाज व परंपरांचे ओझे तसंच परिस्थितीच्या रेटय़ातून निर्माण झालेले आहेत. या सगळ्याला नाटकात निसर्गाचं उत्कट नेपथ्य लाभलेलं आहे. रातकिडय़ांची किरकिर, कुत्र्यांचं भुंकणं, ढगांचा गडगडाट, मोटारीचा आवाज, कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात माणसांच्या गडद होत जाणाऱ्या सावल्या.. असं सर्वागानं नाटक दृक्-श्राव्य-काव्य रूपात चंद्रकांत कुलकर्णी यांनी उभं केलं आहे. पात्रांच्या बोलीवर तर त्यांनी कसून मेहनत घेतल्याचं जाणवतं. विशेष म्हणजे नागर नट मंडळींना वैदर्भीय बोलीचा लहेजा आणि ठसका आत्मसात करायला लावणं सोपं नाही. यातल्या नटांच्या प्रचलित इमेजला छेद देण्याचं आव्हानही त्यांनी 'वाडा'मध्ये मोठय़ा हिमतीनं पेललं आहे. नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेला यातला वाडा हे या नाटकाचं अभिन्न अंगच आहे. आनंद मोडक यांचं संगीत नाटय़ांतर्गत मूड गहिरं करतं. रवि-रसिक यांच्या विचारी प्रकाशयोजनेतून वाडय़ाचा सबंध भवताल दृश्यमान झालेला आहे. परिस्थितीनं पोकळ झालेल्या जमीनदार देशपांडय़ांच्या कुटुंबातील माणसांचे पेहेराव प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी यथार्थपणे केले आहेत. मुंबईकर सुधीर-अंजलीचे कपडे त्यावेगळे आहेत. किशोर पिंगळे यांच्या रंगभूषेतील अस्सलतेनं 'वाडा'तली पात्रं बाह्य़ांगी जिवंत झाली आहेत.
वैभव मांगले यांनी विनोदी नटाच्या आपल्या इमेजबाहेर येण्याचं धाडस यात प्रथमच केलेलं आहे. भास्करचं सरंजामशाही वागणं-बोलणं, घरातल्या कर्त्यां पुरुषाची हुकूमशाही अशा काही जोशात त्यांनी वठवली आहे, की पूछो मत! त्यांच्या कारकीर्दीतील ही एक अविस्मरणीय भूमिका ठरावी. निवेदिता सराफ यांनी वहिनीचं मोकळेढाकळेपण अस्सल वऱ्हाडी बोलीसह मस्त पेललं आहे. शहरी संस्कार व अंगभूत देशस्थी वृत्ती यांचं कॉम्बिनेशन असलेला सुधीर- प्रसाद ओक यांनी उत्तम रंगविला आहे. पौर्णिमा मनोहरांनी अंजलीचा टिपिकल कोकणस्थीपणा छान दाखवला आहे. उच्छृंखल रंजूच्या भूमिकेत नेहा जोशी फिट्ट बसल्यात. सिद्धेश्वर झाडबुके यांनी 'गरीब बिच्चारा' चंदू साक्षात् साकारला आहे. प्रभाची तगमग, बंडखोरी आणि तिचा तळतळाट प्रतिमा जोशी यांनी सर्वार्थानं दाखविला आहे. भारती पाटील यांनी सोशिक आई जेश्चर-पोश्चरसह यथार्थ उभी केली आहे. अजिंक्य ननावरेंनी परागचा घुमेपणा, व्यसनाधीनतेतून आलेला अपराधगंड तसंच सुधीरसोबतचं निखळ वागणं या सगळ्या भावच्छटा सुंदर दाखवल्यात. विनिता शिंदेंची दादीही लक्षवेधी.
एलकुंचवारांचा हा चिरेबंदी (?) नाटय़'वाडा' गतरम्यतेसह एक उत्कट, समृद्ध जीवनानुभव देतो यात शंकाच नाही.
========================================================================
अनेक वर्षांनी पुन्हा पाहिला ' वाडा चिरेबंदी ' -
डॉ. नरेंद्र गंगाखेडकर
अनेक वर्षांनी पुन्हा पाहिला ' वाडा चिरेबंदी ' -
डॉ. नरेंद्र गंगाखेडकर
विजय तेंडूलकर , गिरीश कर्नाड आणि बादल सरकार ह्यांनी भारतीय रंगभूमी गाजवली. त्याच ताकदीचा राष्ट्रीय पातळीवरचा दुसरा मराठी नाटककार म्हणजे महेश एलकुंचवार. खरा नागपूरकर म्हणजे वऱ्हाडी माणूस. काही वर्षापूर्वी त्यांचे ' वाडा चिरेबंदी' हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर एनसीपीए सभागृहात पाहिले होते. त्यात आईची भूमिका विजया मेहता ह्यांनी केली होती आणि नाटकाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. तो एक आगळा वेगळा सुंदर प्रयोग होता. महेश एलकुंचवार ह्यांच्या नाट्यलेखनावर विजयाबाई खूष होत्या. त्यामुळेच त्यांनी हे नाटक हातात घेतले होते.
आज तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करीत आहेत प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. एका नव्या ढंगात आणि एका नव्या संचात . त्यांनी २० वर्षापूर्वी ' अविष्कार ' साठी हे नाटक रंगमंचावर आणले होते. तेही मी पाहीले होते. विजया मेहतांचा प्रयोग अजूनही स्मरणात आहे. तपशील आठवत नव्हते.
विजयाबाईनी त्यांच्या ' झिम्मा ' ह्या आत्मचरित्रात ह्या नाटकावर एक प्रकरण खूप विस्ताराने लिहिले आहे. ते पुन्हा वाचले आणि जुन्या प्रयोगाची आठवण जागी झाली.
एलकुंचवार ह्यांच्या लिखाणात आत्मशोध असतो. 'माणूस' शोध असतो. आंतरिक व्यथेची लय असते. वास्तव असते. त्यांची पात्रे आजूबाजूची जीवंत माणसे असतात. जणू काही आपल्या जीवनाचे प्रतिबिंबच. वैदर्भी असल्यामुळे वऱ्हाडी रंग असतो. जयवंत दळवी आणि श्री. ना. पेंडसे जसे कोकणी माणसे आपल्यापुढे उभी करतात तसेच एलकुंचवार वऱ्हाडी माणसे आपल्यासमोर उभी करतात. आमच्या मराठवाड्यात अशीच माणसे आहेत. त्यांच्यात खूप साम्य आहे. वऱ्हाडी आणि मराठवाडी बोली मराठी भाषेलाही वेगळा गोडवा आहे. पुणेकर कोब्रांची ती मराठी भाषा नाही. अनुभव विश्व पुण्या- मुंबईपेक्षा खूप वेगळे आहे.
एलकुंचवारांच्या ह्या नाटकात जी पात्रे आहेत, त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध गुंतागुंतीचे आहेत. त्यांच्यात संघर्ष आहे. प्रत्येक संवादाला जीवंत स्पर्श आहे. रूप - गंध आहे. नाद आणि लय आहे. एक धगधगते सत्य आहे. ही आजूबाजूची आपली माणसे आहेत. आपल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे.
एलकुंचवार ह्यांचे हे नाटक म्हणजे उत्कट वास्तव . त्यातील पात्रे ही खरी माणसे. आजूबाजूला दिसणारी. विजय तेंडुलकरासारखी त्यांची नाटकावर पकड आहे, त्यांची नाटके अभिजात आहेत. दळवी - पेंडसे जसा कोकण उभा करतात तसाच एलकुंचवार वऱ्हाड उभा करतात. त्यांच्या लिखाणातील आत्मशोध हा आपलाच असतो म्हणून तो आपल्याला भावतो.
विदर्भातील एका ब्राम्हणी देशपांडे कुटुंबाची ही गोष्ट. एकेकाळी समृद्ध जीवन जगणारे हे चिरेबंदी वाड्यातील एकत्र कुटुंब. त्यांचे भरभराटीचे जीवन अनुभवलेला हा जुना वाडा. मोडकळीला आलेला . कुटुंबही विस्कटलेले. कुटुंब प्रमुख म्हणजे कर्ता माणूस देवाघरी जातो. त्याची आई , पत्नी , तीन मुले , सुना , नातवंडे आणि विवाह नं झालेली वयस्कर मुलगी. एक मुलगा मुंबईला बायको- मुलाबरोबर रमला आहे असे बाकीच्यांना वाटते तर शेतीमध्ये फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे मोठा मुलगा आणि त्याची पत्नी वैतागलेली असते. हुशार असूनही शिक्षण सोडावी लागणारी पण लग्न नं झालेली मुलगी एकंदर जीवनाला कंटाळलेली असते. चित्रपटाच्या प्रभावामुळे आपल्या वेगळ्या विश्वात रमलेली नात आणि दारूचे व्यसन लागलेला नातू ही पात्रेही कर्ता माणूस गेल्यानंतर क्रियाकर्म करण्यासाठी एकत्र आलेली असतात. त्या १५ दिवसात घडलेले हे नाट्य.त्या १५ दिवसातील ह्या कुटुंबातील ताण- तणाव म्हणजे हे नाटक.
ह्या नाटकात दिसणारी वऱ्हाडी माणसे आमच्या मराठवाड्यातही दिसून येतात. ह्या नाटकातील देशपांडे कुटुंब मी परभणीत अगदी जवळून पहिले आहे. विलक्षण साम्य मला आढळून आले आहे . अशी माणसे आणि असे कुटुंब माझ्या खूप ओळखीचे आहे. त्यांना मी खूप जवळून पाहिले आहेत. त्यामुळे हे नाटक वास्तववादी तर आहेच पण ह्यातील संवाद अस्सल आहेत. ते माझ्या कानावर अनेकदा पडले आहेत. मराठवाडी आणि वऱ्हाडी बोली भाषेतला रानवटपणा वेगळाच असतो. तो ह्या नाटकात वाक्यावाक्यात दिसून येतो .
चंद्रकांत कुलकर्णी मराठवाड्याचे आहेत. त्यांना हा परिसर आणि ही माणसे परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात वेगळेपण दिसून येते, जे विजया मेहता ह्यांच्या दिग्दर्शनात दिसून आले नव्हते. कारण विजया मेहतांना वऱ्हाडी माणसे माहित नव्हती आणि बोली भाषा तितकीशी ओळखीची नव्हती. ते वास्तव त्यांनी जवळून पाहिले किंवा अनुभवले नव्हते. म्हणूनच ह्या नाटकातील आईची भूमिका त्यांना तेवढी जमली नव्हती. त्यांनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रात हे प्रांजळपणे कबूल केले आहे .
विजयाबाईनी त्यावेळी सादर केलेल्या नाट्यप्रयोगातील नेपथ्यही तेवढेसे जमले नव्हते. ' प्रयोग उत्तम पण नेपथ्य मात्र चुकीचे ' असा शेरा प्रसिद्ध नेपथ्यकार गोडसे ह्यांनी दिला होता हे त्यांनीच नमूद केले आहे. चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना ते अधिक चांगले जमले आहे , हे निश्चित. वऱ्हाडी लहेजा विजयाबाईना जमला नव्हता , हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले हा त्यांचा मोठेपणा. खरं म्हणजे, मला तेंव्हाही त्यांनी सादर केलेला प्रयोग आवडला होता. तो त्यावेळी एक वेगळा नाट्यप्रयोग होता.
हे नाटक त्यावेळी फारसे चाललं नाही. कारण मुंबई - पुण्यात लोकांना हे फारसं भावलं नाही. नटमंडळीनाही ते पेललं नसावं.
चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना ते अगदी सहज जमलं आणि त्यांनी सर्वांच्याकडून चांगली कामे करून घेतली ह्यात वाद नाही. त्याचे कारण नाटककार आणि दिग्दर्शक ह्यांचे जुळलेले नाते.दोघांची वेवलेन्थ जुळली असे म्हणणे अधिक बरोबर. जे विजयाबाईना सहज जमले नाही ते चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना अगदी सहज जमले कारण त्यांनी हे वास्तव जवळून पाहिले आहे.
सर्व नट - नट्यांनी कामे सुरेख केली आहेत. एक देखणा प्रयोग. सुरुवातीला पहिले ८-१० मिनिटे नाटकावर पकड बसली नव्हती. नंतर व्यवस्थित जमले.
योगायोगाने माझी आणि नाटककार एलकुंचवार ह्यांची थोडीशी ओळख झाली होती.आम्ही चीन - जपानच्या सहलीवर होतो. आमच्या ग्रुप मध्ये एलकुंचवार होते. मी त्यांना ओळखले . स्वतःच ओळख करून घेतली. आणि नाटकावर गप्पा सुरु झाल्या . १५ दिवसात अनेकदा गप्पा झाल्या. मोठा मिस्किल माणूस . एकदा ओळख झाली की खूप बोलणारा . नकला करणारा . सहजपणे हसवणारा . तसा आपल्याच कोशात रमलेला . एरव्ही इतरात फारसा नं मिसळणारा . त्यांचा थोडासा सहवास लाभला . असा हा मोठा नाटककार योगायोगाने भेटला . त्या १५ दिवसात बराचसा जवळून पाहीला.
विजय तेंडुलकराना मी चांगलेच ओळखत होतो. त्यांचे ' रामप्रहर ' मी प्रकाशीत केले होते. एलकुंचवारही थोडे ओळखीचे झाले . मी त्यांना नाटककार म्हणून ओळखत होतोच. त्यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे म्हणून चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांचे अभिनंदन . महेश एलकुंचवार ह्यांना मनापासून शुभेच्छा. असेच लिहित रहा. आम्ही बघत राहू.
त्यांचे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे. काहीसे गंभीर वळणाचे असलं तरी ' माणूस' शोध घेणारे हे नाटक छान आहे. अवश्य बघा . आवडेल .


